Baji Prabhu Deshpande_स्वराज्यनिष्ठ बाजी प्रभू देशपांडे

बाजी प्रभू देशपांडे यांचा इतिहास
मराठा साम्राज्याचे लढवय्ये शूर योद्धे म्हणून आज इतिहास बाजीप्रभू देशपांडेंचे नाव अत्यंत आदराने आणि गौरवाने घेतआहे.
त्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली.

 

 

असे प्रामाणिक पराक्रमी धैर्यवान सैनिक प्राणापलीकडे लढले म्हणून आज डोळ्यांनी हे स्वराज्य आपल्याला पहाता आले.

जन्म :

        बाजीप्रभुचा जन्म भोर जवळील शिंदे या गावात, सन 1615 साली झाला असा अंदाज बांधला जातो. पुणे जिल्ह्यातील भोर नावाचा तालुका आहे. त्या भोर तालुक्याचे बाजीप्रभू हे पिढीजात देशपांडे होते. बाजीप्रभुंची हुशारी आणि त्यांचे बळ कौशल्य पाहून शिवरायांनी त्यांना आपले स्वराज्य मोहिमेत सहभागी करून घेतले आणि पुढे मरेपर्यंत बाजीप्रभू शिवरायांची एकनिष्ठ राहिले.

बाजीप्रभू देशपांडे यांची पावनखिंडीतील झुंज :

           छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे जे व्रत हाती घेतले होते त्यात असंख्य मावळ्यांनी मदत केली. प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती पण दिली. मृत्यू समोर दिसत असतानाही त्यांनी स्वतःचे प्राण अर्पण केले आणि स्वराज्य जोपासले. प्रसंगी महाराजांचे पण प्राण वाचविले. आजच्या लेखात आपण अशाच एका मावळ्याची माहिती बघू या की ज्याने स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन महाराजांना पर्यायाने स्वराज्याला वाचविले. ते सरदार होते बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतील म्हणजेच Baji
Prabhu Deshpande Pavankhind पराक्रम आजही अंगावर शहारा आणतो. बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंड मधील झुंजीला जगाच्या इतिहासात आदराचे स्थान मिळाले आहे. तर मग जाणून घेऊ या बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत म्हणजेच Baji
Prabhu Deshpande Pavankhind पराक्रमाची शर्थ करून कसे स्वराज्य वाचविले.

महाराजांचेआदिलशाहीमुलुखावरआक्रमण

        अफजलखान मोठा बलशाली सरदार होता. पण महाराजांनी त्याचे व आदिलशाही फौजेचे पारिपत्य केले. प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिलशाही फौजे चा धुव्वा उडवून आदिलशहाला महाराजांनी मोठे खिंडार पाडले. १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजखानाला मारले त्याच दिवशी महाराजांनी आदिलशाही मुलुख पादाक्रांत करण्यासाठी मोहीम राबवली. त्यानुसार नेतोजी पालकर आणि दोरोजी यांच्या नेतृत्वाखाली सैन्य दिले. नेतोजीला थेट विजापूर पर्यंत आक्रमण करण्यास सांगितले तर दोरोजी ला कोकणात हल्ला करून आदिलशाही मुलुख काबीज करण्यास सांगितले.

स्वतः महाराजांनी सातारा, कोल्हापूर प्रांतात घुसून थेट पन्हाळा किल्ल्यापर्यंत चा मुलुख घेण्याचे ठरविले. अशाप्रकारे आदिलशाहीवर तीनही बाजूंनी महाराजांनी वार केला.

प्रतापगडाच्या भेटीत अफजलखान मारला गेला हे आदिलशाही मुलुखात अफजखानाच्या मृत्यूची अजिबात माहिती नव्हती. आदिलशाही मुलुख निश्चिंत होता. पण स्वराज्याच्या फौजांनी आदिलशाही मुलूखात धुमाकूळ घातला. अफजल खानाच्या मृत्यूनंतर केवळ १३ दिवसांनी महाराजांनी कऱ्हाड, सुपे असा मुलुख काबीज करत कोल्हापूर पर्यंत पोहोचले. तेथून जवळच होता शिलाहार राजांचा प्रसिद्ध किल्ले पन्हाळा. ह्या अभेद्य किल्ल्याकडे स्वराज्याच्या घोड्यांच्या टापा वळल्या.२८ नोव्हेंबर १६५९ ला पन्हाळा किल्ला स्वराज्यात सामील झाला.

रुस्तुमेजमानआणिफाजलखानयांचापराभव

शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला आणि आजूबाजूचा मुलुख घेतल्यावर आदिलशाहीत हाहाकार माजला. नेतोजी च्या फौजेने ही धुमाकूळ घातला. हे पाहून आदिलशहाने रुस्तूमेजमान आणि अफजलखानाचा पुत्र फाजलखान या दोघांना मोठी फौज देऊन पाठविले. परंतु महाराजांनी या दोघांचा पराभव केला. आदिलशाही फौज पळत सुटली. पुन्हा एकदा महाराजांना मोठा विजय मिळाला.

सलाबतखानसिद्दीजौहरचीस्वारी

        काही दिवसातच महाराजांनी आदिलशहाला जबरदस्त तडाखे दिले. शिवाजी महाराजांवर ज्यांना ज्यांना पाठविले ते पराभूतच झाले. महाराजांच्या या वाढत्या पराक्रमाला आळा घालण्यास कोणीच तयार होत नव्हते. पुरा आदिलशाही दरबार काळवंडला. आणि नेमके त्याचवेळेस एका बलाढ्य सरदाराने स्वतःहुन पत्र लिहून बादशहाच्या सेवेसाठी कामगिरीची मागणी केली.

हा सरदार होता कर्णुळचा सिद्दी जौहर. विजापूरच्या दरबारला तर अत्यानंद झाला. सिद्दी जौहरने स्वतः हून कामगिरी मागितली. बादशहाने खुश होऊन सिद्दी जौहरचा थाटामाटाने सत्कार केला. त्यास सलाबतखान असा किताब देऊन भलीमोठी फौज दिली. ही फौज किमान ३५ हजार होती.
बादशहाने कोकणातील सूर्यराव सुर्वे, जसवंतराव, सावंतवाडीचे भोसले इत्यादी सरदारांना फर्मान पाठविली. तसेच दिल्लीच्या बादशहाला म्हणजे औरंगजेबालाही एक अर्ज पाठवून स्वराज्य बुडविण्यासाठी मदत मागितली. एकूण आता स्वराज्यावर चारही बाजूने संकटं आली.

पन्हाळ्यालावेढा

 

सलाबतखान सिद्दी जौहर जेव्हा विजापूरहुन निघाला तेव्हा महाराजांनी मिरजेच्या किल्ल्यास वेढा दिलेला होता. सिद्दी जौहरच्या एवढ्या मोठ्या फौजेशी खुल्या मैदानात युद्ध करणे शक्य नव्हते म्हणून महाराज पन्हाळा किल्ल्यावर परत आले.महाराजांच्या मागोमाग सिद्दी जौहर पण आला.

पन्हाळा किल्ला सहजासहजी जिंकणे सोपे नव्हते. त्यामुळे त्याने किल्ल्याला कडेकोट वेढा घातला. आणि महाराज वेढ्यात अडकले. सिद्दीने राजापूरच्या इंग्रजांकडून लांब पल्ल्याच्या तोफा आणि दारूगोळा मागितला. स्वतः हेन्री रिव्हींग्टन तोफा आणि दारूगोळा घेऊन सिद्दीच्या वेढ्यात सामील झाले.

वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे कूच

महाराज सिद्दीच्या वेढ्यात अडकले आणि तेवढ्यातच दिल्लीच्या बादशहा औरंगजेबने दख्खनची मोहीम आपला मामा शाहिस्तेखान याचेकडे सोपविली. शाहिस्तेखान पुण्यात येऊन लालमहाल ताब्यात घेतला. मुघली फौजांनी स्वराज्यात धुमाकूळ घातला. मावळ्यांनी जसा जमेल तसा मुघलांना प्रतिकार करणे चालूच होते.इकडे सिद्दीचा वेढा अत्यंत कडक बंदोबस्तात होता. नेतोजी पालकर आणि सिद्दी हिलाल यांनी सिद्दी जौहरचा वेढा विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला.पण त्यांना त्यात अपयश आले.

        पावसाळ्यात सिद्दीचा वेढा कमजोर होईल अशी अपेक्षा महाराजांना होती. परंतु तीही अपेक्षा फोल ठरली. सिद्दीने वेढा अजिबात कमजोर पडू दिला नाही. सिद्दीच्या फौजेच्या तुलनेत गडावरील सहा हजार फौज तुटपुंजी होती. त्यामुळे कसेही करून वेढा फोडून सहिसलामत बाहेर पडणे आवश्यक होते. महाराज अहोरात्र याच विचारात होते.
गडावरील मंडळीसोबत खलबते सुरू होती. यामध्ये त्र्यंबक भास्कर, गंगाराम पंत असे मुत्सद्दी होतेच. शिवाय बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे हे हिरडस मावळातील पराक्रमी आणि निष्ठावान सरदार होते.

बाजीप्रभू देशपांडे यांचे गाव भोर तालुक्यातील हिरडस मावळात होते. त्यांचा जन्म १६१५ च्या आसपासचा असावा. हिरडस मावळातील बांदल देशमुखांचे बाजीप्रभू दिवाण होते. जेव्हा बांदल स्वराज्यात सामील झाले तेव्हा बाजीप्रभूही स्वराज्याचे झाले.

        सिद्दीचा वेढा तलवारीने तोडणे अशक्य झाले तेव्हा महाराजांनी एक अत्यंत धाडसी बेत आखला. निवडक सैन्याची तुकडी घेऊन रात्रीच्या सुमारास विशाळगडाकडे कूच करायचे. पण हे व्हावे कसे ? कारण सिद्दीने भर पावसात देखील वेढा ढिला पडू दिला नाही. काही करून हा वेढा ढिला पडलाच पाहिजे. यासाठी महाराजांनी एक गनिमी कावा केला. त्यानुसार सिद्दिकडे आपला दुत म्हणून गंगाधरपंत यांना पाठविले.

        शिवाजी महाराज बिनाशर्त दुसऱ्या दिवशी शरण येणार अशी बातमी त्यांनी सिद्दीला दिली. लागलीच ही बातमी विजापुरी सैन्यात पसरली. जे अपेक्षित होते तेच घडले. इतक्या महिन्यांपासून अहोरात्र जागून वेढा दिलेल्या सैन्यास हायेसे वाटले. आता उद्या या मोहिमेचा शेवटच होणार आहे तेव्हा काय आता काळजी घ्यायची ? कशाला जागत राहायचे? मोर्चावरचे पहारेकरी खुशाल झोपले. नेमका याच गोष्टीचा फायदा महाराजांनी घेतला. महाराजांचे कोणतेही काम नियोजनबध्द असे.

        महाराजांनी त्यानुसार अगोदरच तयारी केलेली होती. हेरांकडून कमीतकमी धोक्याची वाट शोधण्यात आली. म्हणजे त्या ठिकाणी पहारेकरी कमी वा थोडे दूर असतील. नियोजनानुसार महाराज पन्हाळा किल्ल्यावरून विशाळगडाकडे मध्यरात्री निघायचे ठरले. सोबत सहाशे मावळे. अर्थात बाजीप्रभू आणि फुलाजी होतेच. महाराज पालखीत बसले. मावळे निघाले. सोबत एक रिकामी पालखी पण घेतली. हो रिकामी पालखी. जर शत्रूला सुगावा लागला आणि पाठलाग झाला तर त्या रिकाम्या पालखीत महाराजांसारखा दिसणारा मावळा बसवायचा आणि शत्रूला हुल द्यायची. ह्या रिकाम्या पालखीत बसणार होता शिवा काशीद. अशी तयारी करून बाजीप्रभू आणि मावळे निघाले. ही तारीख होती १२ जुलै १६६०.

        मध्यरात्रीच्या सुमारास ही दिंडी विशाळगडाकडे निघाले. हेरांनी अचूक हेरलेल्या वाटेने मावळे चालले होते. पाऊस सुरू झाला होता. सोसाट्याच्या वारा आणि कडकडणाऱ्या विजा यात शत्रू सैन्याच्या वेढ्यातून मावळे अलगद बाहेर पडले. चिखलातून, जंगलातील दगडधोंडे असलेल्या रस्त्यातून मावळे अक्षरशः पालखी पळवित होते. पन्हाळा ते विशाळगड हे अंतर सुमारे कोस होते. कसेही करून लवकरात लवकर विशाळगडावर पोहोचायचे होते. शत्रूला सुगावा लागायच्या आत. आणि  शत्रूला सुगावा लागलाच. सिद्दीच्या हेरांनी अचूक हेरले की मावळे महाराजांना घेऊन विशाळगडाकडे जात आहेत.

        सिद्दीला ही बातमी मिळताच तो अवाक झाला. एवढा कडक बंदोबस्त ठेऊन मावळे वेढ्यातून कसे निसटले हेच त्याला कळेना. त्याने आपल्या जावयाला सिद्दी मसूदला महाराजांच्या पाठलागावर पाठविले. आणि इकडे वेढा पुन्हा सक्त केला. सिद्दी मसूद 3 हजार फौज घेऊन विशाळगडाकडे महाराजांच्या पाठलागावर निघाला. महाराजांना सुद्धा कळले की सिद्दीच्या हेरांनी आपल्याला पहिले. आता लवकरच सिद्दीची फौज पाठलागावर येईल. त्यामुळे आधीच ठरल्याप्रमाणे रिकाम्या पालखीत शिवा काशीद बसला आणि दहा – बारा मावळे त्या पालखी सोबत सरळ मार्गाने पुढे निघाली. महाराजांना घेऊन बाजी प्रभू आणि मावळे आडवाटेने विशाळगडाकडे निघाले.

 

जेव्हा सिद्दी मसूद पाठलाग करत आला तेव्हा त्याला काही माणसे एक पालखी पळवित नेत असताना दिसले. पालखीला घेराव घालून आत कोण आहे हे विचारले असता आत शिवाजी महाराज असल्याचे सांगण्यात आले. सिद्दी मसूद खूष झाला. आदिलशाही सैन्य विजयाच्या ललकाऱ्या देत पन्हाळा किल्ल्याकडे निघाले.

        जेव्हा सिद्दी जौहरच्या पुढे पालखी नेण्यात आली त्यात दुसरेच शिवाजी महाराज निघाले. आदिलशाहीतील काही सरदारांनी शिवाजी महाराजांना बघितले होते. सिद्दी जौहरचा हिरमोड झाला. त्याने पुन्हा सिद्दी मसूदला विशाळगडाकडे जाण्यास सांगितले. या एवढ्या वेळात महाराज बरेच दूर निघून गेले. नेमका हाच हेतू होता महाराजांचा दुसरी पालखी सोबत ठेवायची. आणि तो साध्यही झाला. शिवा काशीदने स्वतःचे प्राण अर्पण करून इतिहासात अमर झाला.

बाजीप्रभूदेशपांडेयांचीपावनखिंडीतीलझुंज

 
 दिवस उजाडत असताना मावळे गजापुरच्या खिंडीत पोचले. रात्रभर न थांबता मावळे पालखी पळवित होते. लक्ष्य एकच होते महाराजांना सुरक्षितपणे विशाळगडाला घेऊन जाणे. तेवढ्यातच आदिलशाही सैन्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. आता काय करायचे असा प्रश्न महाराज आणि बाजीप्रभू यांना पडला. यावेळी बाजीप्रभूंनी मोठ्या हिंमतीने आणि वडिलकीच्या भावनेने महाराजांना ३०० मावळे घेऊन विशाळगडाकडे जाण्यास सांगितले. राहिलेले ३०० मावळ्यानिशी घोडखिंडीत शत्रूला रोखण्यास थांबले. महाराजांनी गडावर पोचल्यावर तोफेचे आवाज द्यायचे. तोपर्यंत बाजींनी सिद्दीच्या सैन्याला खिंडीत रोखून धरायचे असे ठरले.

        बाजीप्रभू आणि मावळे घोड खिंडीत सज्ज झाले. आदिलशाही सैन्य समीप आले. शत्रुची पहिली तुकडी समोर आली. आणि भयंकर आवेशाने बाजी प्रभू आणि मावळे शत्रवर तुटून पडले. दोन्ही हातात दांड पट्टे चढवून बाजीप्रभू शत्रूंची मुंडकी उडवीत होते. एकाच ध्यास होता विशाळगडावर महाराज पोचून तोफेचे आवाज येत नाही तोपर्यंत शत्रूला खिंड ओलांडू द्यायची नाही. बाजीप्रभू, फुलाजी आणि इतर मावळे बेफाम होऊन लढू लागले.

शत्रूंच्या तुकड्यावर तुकड्या येत होत्या. पण मावळे जे होते तेवढेच लढत होते. कालची पूर्ण रात्र धावत होते मावळे आणि आज तोफेचे आवाज येईपर्यंत शत्रूला रोखून धरायचे होते. प्रसंग फार बाका होता. पण बाजी, फुलाजी आणि मावळे आदिलशाही सैन्याच्या थोडे देखील पुढे येऊ देत नव्हते. कालपासून जवळपास २० – २२ तास सतत झटत होते सर्वजण. अंग पूर्ण लाल झाले तरी बाजीप्रभू लढत होते. पण तोफेचा आवाज अजूनही आला नव्हता.

इकडे महाराजांना घेऊन विशाळगडाकडे मावळे पळत होते. पण विशाळगडालाही सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव यांनी वेढा दिला होता. महाराज येत आहेत हे दिसल्यावर सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव यांनी युद्धाची तयारी केली. महाराजही पालखीतून बाहेर पडले.

विशाळगडाच्या पायथ्याशी ही जबरदस्त लढाई सुरू झाली. महाराज आपल्या भवानी तलवारने शत्रूंची साखळी तोडू लागले. मावळेही मोठ्या तडफेने सूर्यरावाच्या सैन्यावर तुटून पडले. काही करून वेढा फोडून विशाळगडावर महाराजांना सहिसलामत घेऊन जायचेच. हाच ध्यास होता. आणि सूर्यरावचा वेढा महाराजांनी फोडला. मावळ्यांसह महाराज विशागडावर पोचले. जवळपास २१ – २२ तासांनी महाराज विशागडावर पोचले.

आणि तिकडे बाजीप्रभू आणि मावळे अजूनही खिंडीत भक्कमपणे पाय रोवून होते. सिद्दीच्या फौजेला समोर थोडे देखील येऊ देत नव्हते. पराक्रमाची शर्थ झाली. घोडखिंड रक्ताने माखली. बाजीप्रभू अजूनही त्याच त्वेषाने लढत होते. तेवढ्यात तोफेचे आवाज ऐकू आले. बाजीप्रभूंनी ते ऐकले. धन्य झाले. पण तेवढ्यात घात झाला. शत्रूचा घाव वर्मी बसला. बाजीप्रभू कोसळले. बाजीप्रभू, फुलाजी आणि असंख्य मावळ्यांच्या रक्ताने गजापुरची घोडखिंड पावन झाली.

पावनखिंड ! १३ जुलै १६६० चा हा दिवस. यादिवशी ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू फुलाजी आणि इतर मावळे यांनी आपले प्राण अर्पण केले आणि स्वराज्य व महाराज यांना वाचविले. ही अशी निष्ठावान मंडळीं होती म्हणून स्वराज्य जोपासले गेले. धन्य ते मावळे!!!

बाजीप्रभु आणि त्यांचे बंधू फुलाजी यांच्या पार्थिवावर महाराजांनी विशालगडावर अंत्यसंस्कार केले. त्याठिकाणी बाजीप्रभु आणि फुलाजी यांची समाधी आहे. बाजीप्रभु देशपांडे आपल्या पराक्रमाने आणि स्वमिनिष्ठेने अजरामर झाले. त्यांच्यावरील पोवाडे ऐकून अंगावर शहारे येतात. धन्य ते बाजीप्रभु अन फुलाजीप्रभु !!!

मृत्यू 

सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी जखमी झालेले शरीर, स्वतः जखमी, कशाचेही भान बाजींना नव्हते महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले, याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना 31 जुलै 1660 रोजी घडली.

 

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली. म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी फुलाजी बंधूंवर विशाळगडावर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.
शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची गाथा जेवढे ऐकावे तेवढे कमीच आहे. एका पेक्षा एक असे बलाढ्य मावळे त्यांच्याकडे होते.



    लक्ष्य दया:

तुमच्या जवळ बाजीप्रभू देशपांडे बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 

धन्यवाद्

निष्कर्ष
अश्या प्रकारे आम्हाला जी काही सर्व माहीती तुमच्या समोर उपलबध करता आली आणि अजून काही माहिती मिळाली तर ती हि उपलब्ध करू. हि सर्व माहिती हि खरी असून काल्पनिक आहे.
 
आमचा लेख कसा वाटला हे comment द्वारे नक्की कळवा.
Scroll to Top