स्वराज्याचे पहिले बलिदान वीर बाजी पासलकर (Veer
Baji Pasalkar)
|| स्वराज्याचे पहिले बलिदान, वीर बाजी पासलकर ||
स्मृतिदिन दिनांक
स्वराज्याच्या कामात अनेक मावळे धारातीर्थी पडले परंतु या स्वराज्याच्या लढाईत पहिले वीरमरण येण्याचा मान हा स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर यांना मिळाला. बाजी पासलकर हे मोझे खोऱ्यातील वतनदारत्यांचे घराणे हे देशमुखी. मावळ प्रांतात त्याचा मोठा दरारा होता.शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना अनेकांची मदत मिळाली. त्यात तरुण सळसळत्या रक्ताची जशी तरुण मंडळी होती त्याप्रमाणेच वय,अनुभव आणि तरुणांनाही लाजवतील अशी पराक्रमी वयस्कर जी माणसे होती त्यातील एक भव्य डाव्य व्यक्तिमत्व म्हणजे बाजी पासलकर बलदंड शरीर,अक्कडबाज मिशा. फौलादी रुंद छाती,तरुणांना लाजवेल आसा पराक्रम करून दाखवण्याची बळकट मनगटाची ताकद. त्यामुळे या साठीच्या माणसाला स्वराज्याच्या कामी वळून घ्यावे,त्यांच्याबरोबर मावळ प्रांतातली आणखीही अनेक मंडळी या स्वराज्यकार्यात मदत करतील असा शिवरायांना जो जेष्ठांकडून सल्ला मिळाला,त्यानुसार राजांनी एक पत्र लिहून ते बाजी पासलकर ह्यांना पाठवले.
स्वतःच्या जिवापेक्षा स्वराज्य आणि माझ्या राजाचा जीव महत्वाचा म्हणणारे असंख्य मावळे या स्वराज्याने बघितले, त्या सर्वांचे स्मरण करून मावळे या भागाला सुरुवात करतोय!
बाजी पासलकर हे शहाजी राजांचे नजीक. शहाजी राजांच्या बऱ्याच काळ ते संपर्कात होते त्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना पुण्याची जहागिरी शहाजी राजांनी दिली तेव्हा त्यांच्यासोबत अनेक निष्ठावान सेवक पाठवले होते. त्यामध्ये दादोजी कोंडदेव आणि बाजी पासलकर हे देखील होते. बाजी हे मोसे खोऱ्यातील मोसे बु. गावचे रहिवासी. मोसे खोऱ्यातील निगडे मोसे पासून ते सांगरून आणि डावेजपासून ते धामण–ओव्होळ पर्यन्तची जवळपास ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती. वतनदारी ही आदिलशहा कडील होती. वतनदार जरी असले तरी गोर–गरिबांच्या कल्याणासाठी ते सदैव तत्पर होते, भांडण तंटे मिटवण्यात त्यांचा हातखंडा होताच त्यासोबतच न्यायदानाच्या बाबतीत ते अत्यंत चतुर होते. त्यांच्या वतनातच नव्हे तर संपूर्ण मावळ खोऱ्यात त्यांच्या चांगल्या कामांची ख्याती होती.
इतिहासात तसे २ वेळा एकाच नावाच्या दोन व्यक्ती आढळतात. पहिले बाजी पासलकर हे बेलसरच्या युद्धात धारातीर्थी पडले आणि दुसरे बाजी हे सवाई बाजी पासलकर काय सावंतांच्या सोबतच्या लढाईत मारले गेले. यातील आपण सरसेनापती बाजी पासलकर म्हणजेच बेलसरच्या लढाईतील बाजींचा पराक्रम जाणून घेतोय.
महाराज आणि माँसाहेब कर्नाटकात होते तेव्हा थोरल्या महाराजांनी पुढील पुणे आणि सुपे वतनाचा विचार केला होता. हे वतन राजमाता आणि राजांकडे देताना त्यांनी काही खबरदारी आणि कारभार स्वीकारणारी मानस म्हणून बाजींना देखील लक्ष द्यायला लावले.
महाराजांचे निकटवर्ती असलेले कान्होजी जेधे यांचे बाजी पासलकर हे सासरे! बाजींना मुलगा नव्हता. त्यांच्या मुलीचा विवाह हा कान्होजीं सोबत झाला आणि त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, त्यांचे नाव बाजी जेधे. या तीनही पिढ्यांनी स्वराज्यासाठी नावाप्रमाणे जीवाची बाजी लावली!
शिवरायांनी रायरेश्वरी स्वराज्य स्थापण्याची शपथ घेऊन रोहिडेश्वर डोंगर पुढे तोरणा, दुराजदेवीचा डोंगर जिंकला. राजांची घोडदौड सुरुच होती आणि यात सोबतीला तरुण राजांच्या वयाची पोरह होतीच पण खूप वयस्कर तरुण देखील होते. राजांनी रोहिडा जिंकला, कोंढाणा जिंकला आणि आदिलशहा ला मोठा धक्का दिला. राजांना यानंतरच शत्रू आक्रमण करेल वाटले होते म्हणून राजांनी चाकण चा किल्ला आणि पुरंदर जिंकून घेतले. पुरंदर जिंकून राजांनी पुरंदरच्या तटबंदीचे काम सुरू केले कारण आदिलशहा च्या आक्रमणाला स्वराज्याच्या दक्षिण टोकालाच अडवायचा आणि तोंड द्यायच अशी त्यांची युक्ती होती.
महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गडावर सर्व हजर झाले होते . गडावर एकच उत्साह होता . दारूखाना भरपूर होता . अचूक जागा हेरून तोफांचे मोर्चे बांधले होते . तटाकडे गोफणदगडांपासून मोठ्या दगडांपर्यंत ढीग रचले होते . शेकडो रामोशी तटांच्या भिंतींवरून गस्त घालीत होते . ही सारी व्यवस्था कावजी मल्हारने पुढे होऊन अंगावर घेतली होती . नेताजींची त्याला साथ होती . गोदाजी जगताप , भिमाजी वाघ , संभाजी काटे , शिवाजी इंगळे , भिकाजी चोर , भैरोजी चोर , पोळ , घाटगे यांच्यासारखे अनेक वीर उत्साहाने वावरत होते . गडाची व्यवस्था पाहून राजे संतोष पावले . दोन दिवसांत खानाच्या बातम्या रामोशी आणू लागले .
खानाने जेजुरी समीप असलेल्या खळत–बेलसरला तळ दिला. त्याने बाळाजी हैबतराव यांना सुभानमंगळ या भुईकोट गढी वर आक्रमण करायला पुढे पाठवले आणि त्याने सुभानमंगळ जिंकला देखील. महाराजांनी कावजी मल्हार यांना सांगितले की आता खानाची वाट बघण्यापेक्षा शिरवळ चा कोट तुम्हाला माहीत आहे तर त्यावर हल्ला करा. कावजी मल्हार यांनी अवघ्या ४०० मावळ्यांना घेऊन सुभानमंगळ कोट जिंकून घेतला.
संतापलेला खान आवेशाने पुरंदरावर चाल करून येऊ लागला. मुसेखान फौजेनिशी झुंज देत आला पण गोदाजी जगतापांनी त्याला पाणी पाजले. मुसेखानाच्या पराभवाने सगळं मोगली सैन्य माघारी फिरले. मराठ्यांनी त्यांचा पाठलाग केला, बेलसरच्या छावणीपर्यंत मराठे घुसले नेतृत्व करत होते बाजी पासलकर! “एकही शत्रू सोडू नका, मावळात घुसलेला दुश्मन परत जात नाही हे कळू द्या सगळ्यांना!” असे गर्जत त्वेषाने बाजी मोगलांच्या गोटात घुसले, सपासप एक एक करत गनिम कापत बाजी आत घुसले. ६५ वर्षाच्या या तरुणाचे शौर्य बघत इतर तरुण मावळे पण कापाकापी करायला लागेल. मोघल पळत होते आणि मराठे पाठलाग करत होते.
घात झाला, बाजी लढताना एक घाव त्याच्या समशेरधारी हाताच्या दंडावर झाला, त्याही घावाला सावरत बाजी मागे वळाले आणि काही कळायच्या आत गनिमाने बाजींच्या छातीवर वार केला. ६५ वर्षाचे तरुण बाजी कोसळले. आपला सरसेनापती जखमी झाला हे पाहून मावळे आणखी द्वेषाने पेटून उठले, त्यांनी हजारो गनिम कापून काढले.
बाजी पडल्याचे कळताच त्यांचे नातू बाजी जेधे यांनी बाजींना यशवंती घोडीवर चढवले मागे असलेले कावजी मल्हार देखील बाजींच्या सोबत होते. त्या यशवंतिला आणि कावजीना देखील या वीरांचे शौर्य जाणवत होते. घोडयावर पटकन टाप टाकून शत्रूला कापणारे बाजी जखमी शरीराने यशवंतीच्या पाठीवर होते, त्या यशवंतीच्या देखील डोळ्यातून अश्रू ओघळत असतील ओ….
राजे गडावर बाजी पासलकर, कावजी मल्हार, बाजी जेधे आणि इतरांच्या पराक्रमाचा गौरव करण्याच्या तयारीत होते, परंतु गडावर विजयाचा निरोप घेऊन आलेल्या कावजींच्या चेहऱ्यावर स्वराज्याच्या पहिल्या विजयाचे हास्य नव्हते. महाराज बाहेर आले, त्यांनी जखमी बाजींना बघितले आणि ते अश्रूंना आवर घालत बाजींपाशी गेले व बाजींना जवळ मांडीवर डोकं ठेवत म्हणाले वैद्यांना बोलवा कोणी तरी. बाजींना माहीत होतं ते आता काही क्षणाचेच सोबती होते! बाजींना मुलगा नव्हता, बाजींना महाराजांच्या रूपाने लेकाची मांडी लाभली, काय ते थोर भाग्य!
वीर पराक्रमी बाजी स्वराज्यासाठी धारातीर्थी पडणारे पहिले मावळे! स्वराज्याचा पहिला सरसेनापती राजांना आणि स्वराज्याला सोडून गेला. प्रतिपदेचा हा स्वराज्याचा विजय पौर्णिमेच्या चंद्राला देखील लाजवणारा होता पण यात हरवलेली चंद्रकोर पुन्हा पाहायला मिळायची नाही!
बाजींच्या धारातीर्थाने इतरही मावळ्यांमध्ये स्वराज्यासाठी सर्वस्व झोकून देण्याची भावना निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने स्वराज्यासाठी मरणारे शूर मावळे या स्वराज्याला लाभले.
बाजींची समाधी आज सासवड जवळ कुंभारवाडा येथे आपल्याला बघायला मिळते.बाजींना वंशपरंपरागत यशवंतराव ही पदवी होती, त्यामुळे या समाधीला यशवंतबाबांची समाधी म्हणून ओळखले जाते. पुण्याजवळील वरसगाव धरणाच्या जलाशयाला बाजी पासलकरांचे नाव देऊन गौरवण्यात आले. बाजी पासलकरांचे स्मारक पुण्यातील दत्तवाडी येथे तानाजी मालुसरे रोड वर आहे. या सर्व समाधी व स्मृतीस्थळांना आयुष्यात एकदा नक्की भेट दिलीच पाहिजे.
८ ऑगस्ट १६४८ ही तारीख बाजी प्रभूंच्या स्मृतीदिन म्हणून समजली जाते आणि याच दिवशी बाजींची पुण्यतिथी साजरी केली जाते. काही ठिकाणी हीच तारिख २४ मे १६४८ सांगितली आहे.
Baji pasalkar
पुढे महाराजांनी बाजींच्या कुटुंबाचे सांत्वन स्वतः जाऊन केले. पासलकर घराण्याने इतिहासात अनेक अजरामर कार्य केले त्यात सवाई बाजी पासलकर असतील किंवा बाजींचे जावई कान्होजी आणि नातू बाजी असतील, बाजींचे बंधू असतील किंवा संभाजी राजांच्या मृत्यूवेळी औरंग्याला थांबवून धरणारे पासलकर बंधू असतील, या सर्वांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली!
बेलसर गावात बाजींचे स्मृतीस्थळ आहे. अशा या वीर सरसेनापती बाजी पासलकरांच्या चरणी मानाचे वंदन करून या लेखाचा शेवट करतो.
पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला – शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती
आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती ! पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला – शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरुन त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,”बाजी,आम्हाला असं पोरकं करून कुठे चाललात?” राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,”आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणाऱ्या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातु सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग ! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !…..” राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली….
बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.पण दुर्दैव असे की याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चिरेबंदी वाडा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे,याचा मोबदला त्यांना शासनाकडून अजूनही मिळाला नाही.त्यांचे वंशज आजही त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम करत आहेत.